17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पुण्यात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांनी वर्तवला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. शहरात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढला आहे. तापमान 36 अंशावर राहण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार, पुढील 48 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशात काही भागात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आयएमडी (IMD) च्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पंजाबमध्ये 18 ते 20 फेब्रुवारी, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, देशात 18 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळणार आहे. काश्मीर खोऱ्यातही पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड, लडाखमध्ये 18 ते 22 या काळात पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.