इचलकरंजीत अनेक भागात आपणाला खूपच घाणीचे साम्राज्य पहावयास मिळते. अनेक ठिकाणी गटार स्वच्छता, रस्ते सफाई असो किंवा कचरा उठावाचे काम असो या प्रत्येक कामात हलगर्जीपणा केला जात आहे. गटार स्वच्छता न केल्याने पाणी तुंबून राहत आहे शिवाय रस्त्यावरील कचरा पुन्हा गटारीत ढकलला जात आहे. काही ठिकाणी साफसफाई केल्यानंतर गोळा झालेला कचरा कर्मचाऱ्यांकडून रस्त्याच्या कडेला टाकून पुन्हा कोंडाळा निर्माण महापालिकेच्या आरोग्य करण्याचा प्रकार होत आहे.
अनेक भागात गटारी तुंबून तसेच कचरा साचून डास तसेच चिलटांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये ताप, टायफाईड, डेंग्यूचे रुग्ण आढळून येताना दिसत आहेत. बहुतांश रुग्ण हे खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. महानगरपालिकेने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी सामान्य नागरिकातून मागणी होत आहे.
स्वच्छतेच्या कामाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी डास तसेच चिलटांचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी ताप तसेच डेंगू सदृश्य रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी महापालिकेने तातडीने सर्व्हे करून माहिती घेतल्यास रूग्णांची संख्या मिळून येईल. तथापि तातडीने धूर फवारणी, औषध फवारणी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.