इचलकरंजी येथील आसरानगरमध्ये असलेल्या कचरा डेपोला बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या भोवती असलेला कचरा मोठ्या प्रमाणात पेटला.त्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला. महापालिकेच्या अग्निशमन दलाने तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. त्यासाठी चार बंबातून पाण्याचा मारा करण्यात आला. मात्र, यामुळे घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला मोठी झळ बसली. मशिनरीचा बराचसा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. शहरातील संकलित होणारा कचरा आसरानगरमधील डेपोत एकत्रित केला जातो.
तेथे कचऱ्यावर दैनंदिन प्रक्रिया केली जाते. त्यासाठी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहे. या प्रकल्पाभोवती कचरा पडला होता. त्या कचऱ्याला बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीमध्ये प्रकल्पातील रबरी पट्ट्याने पेट घेतल्याने आगीचा मोठा भडका उडाला. त्यामुळे आग पसरत गेली. ही बाब तेथील कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.महापालिकेच्या जुनी नगरपालिका व स्टेशन रोडवरील केंद्र अशा दोन्ही ठिकाणाहून अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. चार बंब पाण्याचा मारा केला.
तीन तासांनंतर आग आटोक्यात आली. मात्र, कचरा धुमसतच राहिला होता. आज दुपारी पुन्हा कचऱ्याने पेट घेतला. त्यामुळे पुन्हा अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात. आगाचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. आग लागली की लावली, याबाबत तर्क-वितर्क करण्यात येत आहे.