घरात भीषण आग लागल्यानं एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान पोहोचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूनं परिसरावर शोककळा पसरली आहे.
जालंधरच्या अवतार नगरमधील १२ व्या गल्लीत राहणाऱ्या राहणाऱ्या घरात काल स्फोट झाला. त्यावेळी घरात ५ जण होते. या स्फोटात घरमालक यशपाल घई, त्यांची सून रुची, तिची तीन मुलं (दिया, अक्षय, मंशा) यांचा मृत्यू झाला. यशपाल यांच्या वृद्ध पत्नी बलबीर कौर शेजाऱ्यांकडे गेल्या होत्या. स्फोट झाला तेव्हा त्या घरात नसल्यानं त्यांचा जीव वाचला.
डबल डोअर फ्रिजच्या कॉम्प्रेसेरचा स्फोट झाल्यानं घरात आग लागली. त्यावेळी घरातील सर्व सदस्य हॉलमध्ये बसून टीव्हीवर क्रिकेट सामना पाहत होतं. तितक्यात घरातील फ्रिजचा स्फोट झाला. यानंतर संपूर्ण घरात आग लागली. वायूमुळे घरात तीव्र दुर्गंधी पसरली. कुटुंबातील सदस्यांना काही कळण्यापूर्वीच ते बेशुद्ध पडले. स्फोटाचा आवाज ऐकून शेजारी धावले. आगीची तीव्रता पाहून त्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क केला.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घरातून पाच जणांना बाहेर काढलं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पाचपैकी तीन जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. दोघांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सात महिन्यांपूर्वीच कुटुंबानं डबलडोअरचा फ्रिज खरेदी केला होता.
घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. कुटुंबाचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांची अवस्था वाईट आहे. कुटुंबातील वृद्ध महिला योगायोगानं बचावली. घरातील कर्ती माणसं गेल्यानं वृद्धेकडे कोण पाहणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.