प्लॉट खरेदी प्रकरणी मारहाण व खंडणी प्रकरणी मनोज साळुंखेसह तिघांवर गुन्हा दाखल

प्लॉट खरेदीच्या कारणावरून एका इसमास शिवीगाळ व मारहाण करून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी इचलकरंजीतील जुना एसटी स्टॅन्डजवळ घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भाजपचा माजी नगरसेवक मनोज साळुंखे सह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सागर दत्तात्रय पाटील याने फिर्याद दिली आहे. या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी सागर पाटील याने तारदाळ संगमनगर येथील गट नं. २९८ पैकी ०७ नंबरचा ०२.१० गुंठे प्लॉट खरेदी केल्याच्या कारणावरुन त्यास २८ फेब्रुवारी रोजी संशयितांनी इचलकरंजीतील जुना एसटी स्टॅन्ड परिसरात असलेल्या कार्यालयात बोलावून घेण्यात आले. त्याठिकाणी संगमनगर येथील प्लॉट तू का खरेदी केल्यास, ती जागा माझी आहे असे म्हणत शिवीगाळ करण्यासह लाथाबुक्यांनी मारहाण केली.

तसेच पाटील याच्याकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागत त्याच्या शर्टच्या खिशातून ११ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आणि तू तिथं परत गेलास तर तुला सोडणार नाही अशी धमकीही दिली. खंडणीप्रकरणी अटकेत असलेले माजी नगरसेवक मनोज साळुंखे,शहानवाज मुजावर,दीपक कोळेकर यांना शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवार पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून या घटनेचा तपास पो.नि. सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई जाधव करत आहेत.