लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून विशेषतः गोव्यातून अवैधरीत्या सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या दारूवर वॉच ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन तपासणी नाके (चेक पोस्ट) तयार करण्याचे ठरविले आहे.नांदणी येथील चेक पोस्ट सोडून मरवडे (ता. मंगळवेढा) व वाघदरी (ता. अक्कलकोट) याठिकाणी अतिरिक्त दोन नाके उभारले जाणार आहेत.
निवडणुकीवेळी होणारा अवैध दारूचा सुळसुळाट थांबविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आतापासूनच कामाला लागला आहे.जिल्ह्यातील प्रत्येक गावातील अवैध दारू विक्री व निर्मिती बंद व्हावी, यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांमार्फत ‘ऑपरेशन परिवर्तन’ राबविले जात आहे.
तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ‘हातभट्टीमुक्त गाव’ हे अभियान राबविले जात आहे.कारवाई सुरु असतानाही बहुतेक गावांमध्ये हातभट्टी तथा दारूविक्री सुरूच असल्याची वस्तुस्थिती आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी तयार होणारी हातभट्टी व परराज्यातून वाहतूक होणारी अवैध दारू, यावर विभागाचे विशेष लक्ष असणार आहे.
त्यासाठी पंढरपूर, अकलूज, करमाळा व सोलापूर या चार विभागाचे प्रत्येकी एक पथक व दोन भरारी पथके निवडणुकीच्या काळात रात्रंदिवस कारवाया करतील, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.