पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमध्ये हर घर तिरंगा अभियान साजरा करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भाजपतर्फे १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा हे अभियान मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहे. क्रांती दिनापासून ते स्वातंत्र्यदिनापर्यंत प्रत्येक घर, दुकान व कार्यालयावर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.
भाजपचे राष्टीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या अभियानातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचून त्यांना त्यांच्या घरावर तिरंगा लावण्यासाठी प्रेरित करण्याचा आला आहे. देशप्रेमाचे वातावरण निर्माण होण्यासाठी , देशप्रेमाची भावना जागृत होण्यासाठी ९ ऑगस्टच्या क्रांतिदिनापासून ते स्वातंत्र्यदिनापर्यंत प्रत्येक घर दुकान व कार्यालयावर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक लोकसभागासाठी बूथ स्तरापर्यंतचे कार्यकर्ते जनजागृतीवर भर देणार आहेत. शाळा, महाविद्यालयांशी संपर्क साधून ध्वजारोहणासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. ११ ते १४ ऑगस्ट या काळात पक्ष संघटनेच्या प्रत्येक मंडलात तिरंगा यात्रा होणार आहेत. १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान महापुरुषांचे स्मारक, पुतळा परिसर , स्वातंत्र सैनिकांच्या स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. देशभक्तीपर गीत , तिरंगा यात्रा , मेळावे , सार्वजिनक ठिकाणी होर्डिंग लावून देशभक्तीचा प्रचार व वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. १४ ऑगस्ट रोजी विभाजन विभीषीका दिवस साजरा करण्यात येणार आहे. घरोघरी तिरंगा फडकवणे , महापुरुषांच्या स्मारक , पुतळ्यांची स्वच्छता , फाळणी विभीषीका स्मृतिदिन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
