दिवसेंदिवस चोरीच्या प्रमाणात आतोनात वाढ झालेली पहायला मिळत आहे. असाच एक चोरीचा प्रकार उघडकीस आलेला आहे. इस्लामपूर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. तीन ठिकाणी शटरचे कुलूप तोडून ३७ हजार ५०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली. हा चोरीचा प्रकार सकाळी उघडकीस आला. भरवस्तीत घडलेल्या चोरीच्या प्रकाराने खळबळ उडाली. याप्रकरणी संभाजी वसंत खैरमोडे यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, येथील आझाद चौक परिसरात संभाजी यांचे चप्पलाचे दूकान आहे. संभाजी हे सकाळी दुकान उघडण्यासाठी आले. त्यावेळी दुकानाच्या शटरचे कुलूप उचकटले होते. त्यांनी आत पाहिले असता, काउंटरवरील साहित्य विस्कटलेले होते. ड्रॉव्हर तोडून गल्ल्यातील ३० हजार रुपये चोरट्यानी लांबवले होते. झरीनाका परिसरातील उमिया हार्डवेअरचे दुकानाचे कुलूप फोडून ३ हजार ५०० रुपये लांबवले.
शिराळा नाका परिसरातील अपना बझारचे कुलूप फोडून गल्ल्यातील ४ हजार रुपये लांबवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामध्ये चोरटे कैद झाले आहेत. एका रात्रीत तीन ठिकाणी दुकाने फोडल्याने व्यावसायिकांत घबराटीचे वातावरण आहे.