मोठी बातमी: क्रिकेटपटू आणि बॉलीवूडला भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात?

देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मार्च महिना उजाडल्याने कोणत्याही क्षणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपच्या गोटात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. भाजपकडून पहिल्या टप्प्यात तब्बल लोकसभेच्या 130 उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असे सांगितले जाते. यामध्ये मोदी-शाहांकडून धक्कातंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.

भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्यापूर्वी दिल्लीतील राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यानुसार आगामी निवडणुकीत भाजप अनेक सेलिब्रिटींना निवडणुकांच्या रिंगणात उतरवू शकते. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याचा समावेश असल्याचे सांगते. युवराज सिंह पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतो. याशिवाय, बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारला भाजपकडून चंदिगड किंवा दिल्लीतील एखाद्या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाईल. तर भाजपच्या माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांना दक्षिण भारतामधील एखाद्या मतदारसंघातून निवडणुकीचे तिकीट दिले जाईल, अशी माहिती आहे.

दिल्लीत २९ फेब्रुवारीला भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. ही बैठक रात्री उशीरापर्यंत सुरु होती. या बैठकीअंती भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी लवकरात लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या यादीत भाजपच्या सामर्थ्यशाली नेत्यांचा समावेश असेल. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची नावे असू शकतात. या प्रमुख नेत्यांशिवाय भाजपकडून काही सेलिब्रिटींना उमेदवारी देऊन लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने जोरदार वातावरणनिर्मिती केली जाऊ शकते.