कोल्हापूर-मुंबई विमानात असणार ‘बिझनेस क्लास’..!

कोल्हापूर-मुंबई मार्गावर रविवारपासून (ता. १५) दररोज सुरू होणाऱ्या विमानसेवेत प्रवाशांसाठी पहिल्यांदाच विमानात ‘बिझनेस क्लास’ दर्जाची आसन व्यवस्था उपलब्ध होणार आहे. मोठे उद्योजक, खासदार, आमदार, कलाकार यांच्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, रविवारी (ता. १५) मुंबईच्या दिशेने झेपावणाऱ्या पहिल्याच विमानाचे सुमारे ६० टक्के आरक्षण पूर्ण झाले असून येत्या चार दिवसांत हे ७६ सिटर विमान पूर्ण क्षमतेने भरेल, असा कंपनीचा दावा आहे.

आतापर्यंत कोल्हापूरहून बंगळूरसह अन्य राज्यांत जाणाऱ्या विमानांत ‘बिझनेस क्लास’ आसन व्यवस्था नव्हती. त्यामुळे अनेक मोठे उद्योजक, कलाकार, खासदार, आमदार अशा सुविधांसाठी अन्य पर्यायांचा विचार करत होते. ही बाब लक्षात घेऊन रविवारपासून कोल्हापूर-मुंबई व परत अशा मार्गावर धावणाऱ्या या विमानात ‘बिझनेस क्लास’साठी १२ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

एकूण ७६ सिटर विमानात उर्वरित ६२ जागा ह्या सर्वसाधारण प्रवासाच्या असतील. विविध शासकीय, खासगी कामासाठी कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. रेल्वे, खासगी वाहन किंवा बसने जाण्यासाठी वेळ लागत असल्याने कोल्हापुरात दररोज मुंबईला विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत होती.

सध्या आठवड्यातून तीन दिवसच ही सुविधा आहे. याचा विचार करून स्टार एअरवेज कंपनीने १५ ऑक्टोबरपासून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू केली आहे. कोल्हापुरातून मुंबईला जाणारे विमान बंगळूरहून कोल्हापुरात येईल आणि रात्री मुंबईतून कोल्हापूरमार्गे ते पुन्हा बंगळूरला रवाना होणार आहे.