इचलकरंजी महानगरपालिकेचा ८१६.२० कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सन २०२५-२६ साठी प्रशासक अमोल येडगे व आयुक्त पल्लवी पाटील यांनी सादर केला. महापालिका सार्वत्रिक निवडणुका झाल्या नसल्याने स्थायी समिती व महासभा अस्तित्वात नसून प्रशासकांच्या अधिकारानुसार हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कोणत्याही करवाढीचा प्रस्ताव नाही. सन २०२५-२६ च्या अंदाजपत्रक संदर्भात माहिती देताना प्रशासक तथा जिल्हाधिकारी येडगे यांनी, मालमत्ता कर हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. त्यामुळे गतवर्षेच्या तुलनेत अंदाजे १२ टक्के उत्पन्न वाढ मिळेल, असे अपेक्षित धरण्यात आले आहे.
अंदाजपत्रकात पाणी पुरवठा विभागासाठी सर्वाधिक २९३ कोटीची तरतूद केली आहे. तर बांधकाम विभागासाठी १४७.५२ कोटीची आणि आरोग्य विभागासाठी ४७ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. पाणी पुरवठा विभागाकडील भुयारी गटार योजना, पाणी पुरवठा योजना दुरुस्ती आदी बाबींवर तरतूद केली आहे. आरोग्य विभागात घनकचरा व्यवस्थापनासाठी विशेष तरतूद केली आहे. तर इमारत दुरुस्ती, रस्ते पॅचवर्क, चौक सुशोभीकरण आदीचा समावेश केला आहे. शहरात लवकरच पीए -ई बससेवा सुरु होणार असून त्यासाठी अंदाजपत्रकात १२ कोटीची तरतूद केली आहे. तर शासनाकडून १०७७ कोटी जीएसटी परतावा मिळण्याबाबत यावर्षी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.
महापालिका कामकाजात ई- ऑफिस प्रणालीचा १०० टक्के वापर केला जाणार असून त्यासाठी २.०३ कोटीची तरतूद केली आहे. त्यामुळे सर्व देयके, सर्व प्रशासकीय मान्यता, बजेट आदी सॉफ्टवेअर प्रणाली मार्फत सादर करणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे गतीमान प्रशासन व आर्थिक शिस्त लागेल. त्याचबरोबर महानगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक नविन आर्थिक वर्षात होण्याची शक्यता असल्यामुळे त्याच्या संभाव्य खर्चाचा विचार करता ४ कोटी १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिय अंतिम टप्प्यात असून त्यासाठी १ कोटीची व त्यांच्या वाढीव वेतनासाठी ६.८२ कोटीची तरतूद केली असल्याचे असे प्रशासक येडगे यांनी पत्रकारांना सांगितले.
