लोकसभेसाठी मराठा समाजाचा डाव….

मराठा समाजाकडून मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने मराठा समाजास स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिले. परंतु हा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी फेटाळला. दहा टक्के आरक्षण एकूण आरक्षणाच्या ५० टक्क्यांमध्ये देण्याची मागणी त्यांनी केली. आता या प्रकारानंतर लोकसभेसाठी नवीन रणनीती मराठा समाजाने तयार केली आहे. त्यात उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. तसेच निवडणूक  ईव्हीएमवर घेण्यासाठी अडचण आणली जाणार आहे. मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मनोज जरांगे यांच्या दौऱ्यानंतर धाराशिवमध्ये मराठा समाजाकडून नियोजन बैठका सुरु करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाने धाराशिव लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी प्रत्येक गावात एक उमेदवार उभा करण्याचा निर्धार केला आहे. तसेच भुम येथे बैठकांचे सत्र सुरु केले आहे. सावरगाव येथे बैठक घेऊन गावातून 3 उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मात्र निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. लोकसभा निवडणुकीत प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न लोकशाही पद्धतीने मराठा समाजाकडून होणार आहे. त्यासाठी धाराशिवमधून 1 हजार उमेदवार उभे करणार आहे. 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुक घ्यावी लागते. मराठा समाजाकडून मोठ्या संख्येने उमेदवार उभे केले गेल्यास धारशिवमध्ये प्रशासनाला वेगळीच तयारी करावी लागणारआहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले होते. त्याविरोधात परभणीत 11 मार्च रोजी सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. परभणीत सकल मराठा समाजाकडून आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.