पेठवडगावचा प्रस्तावित विकास आराखडा स्थगित

वडगाव शहराच्या प्रस्तावित विकास आराखड्यास स्थगिती देत असून, हद्दवाढ झाल्यानंतर शहरातील नागरिकांना विश्वासात घेऊन नवीन विकास आराखड्यास परवानगी देण्यात येईल. पालिकेच्या नवीन इमारतीसाठी पाच कोटींचा निधी दिलेला आहे.आणखी लागेल तेवढा निधी दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या घोषणेचे शहरातील नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले.

येथे पालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा तसेच शिवराज्य भवन बांधकामाचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, आमदार राजू आवळे प्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी विकास आराखड्यास स्थगिती देत असल्याचे पत्र प्रविता सालपे यांच्याकडे दिले. ते पत्र वाचून दाखविले. विकास आराखडा रद्द होण्याचा आम्ही दिलेला शब्द खरा करून दाखविला, असे त्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.