नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात वेळ राखीव ठेवूनही सुळकूड पाणी योजनेसंदर्भात निवेदन देण्यासाठी गेलेल्या ‘आम्ही सावित्रीच्या लेकी फौंडेशन’च्या महिलांना मुख्यमंत्र्यांपर्यत निवेदन पोहचवता आले नाही.यामुळे या महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
गेल्या अनेक दिवसांपासून सुळकूड पाणी योजनेच्या प्रश्नाने गंभीर वळण घेतले आहे. याबाबत विविध राजकीय पक्ष, संघटना यांच्यासह महिला संघटनांनी सुळकूड योजनेतूनच इचलकरंजीला पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आंदोलने केली आहेत. तरीही अद्याप यावर ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान, आज विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दौरा होता. नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठी हातकणंगले येथे वेळ राखीव ठेवला होता.
त्यामुळे इचलकरंजी येथील ‘आम्ही सावित्रीच्या लेकी फौंडेशन’च्या जोत्स्ना भिसे, सीमा पाटील, सावित्री हजारे, सुषमा साळुंखे, शोभा इंगळे या महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यासाठी आल्या होत्या. मात्र अचानक गर्दी झाल्याने त्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यत पोहचवता आले नाही. त्यामुळे थेट माईक हिसकावून घेत या महिलांनी निवेदने स्वीकारायची नव्हती तर वेळ राखीव का ठेवला, असे म्हणत नाराजी व्यक्त केली