इचलकरंजी, येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात (IGM) उपलब्ध आरोग्य सुविधा, सुयोग्य व्यवस्थापन व नियोजन आणि दिली जाणारी आरोग्य सेवा यामुळे सन २०२४-२५ या वर्षातील प्रथम क्रमांकाचा ‘कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. याद्वारे रुग्णालयास ६० लाखाचे बक्षिस मिळाले आहे. रुग्णालयाच्या या यशाबद्दल आमदार राहुल आवाडे यांनीही रुग्णालयातील संपूर्ण स्टाफचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत ‘कायाकल्प’ पथकाकडून येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देऊन सन २०२४ मध्ये तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागासह स्त्री रोग विभागाची पाहणी करून तेथील व्यवस्थापन व गरोदर मातांच्या तपासणी व सेवा सुविधांची माहिती घेतली होती. तसेच रुग्णालयात असलेल्या प्रसूती विभाग, शस्त्रक्रिया विभाग, डायलेसिस विभाग तसेच रुग्णालयातील कार्यरत विभागांची पाहणी करून संपूर्ण कामकाजाचा आढावा घेत पथकाने सुरू असणाऱ्या आरोग्य सेवेबाबत समाधान व्यक्त करत आरोग्यसेवा बाबतीत मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्यानंतर २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्यातील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, महिला रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण भागातील उपकेंद्रे आणि शहरी भागातील शहरी सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये कायाकल्प उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली. या सर्वांचा आढावा घेऊन जिल्हा रुग्णालये या वर्गामध्ये इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयास ८४.२५ गुणांसह कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे.
तपासणीसाठी डॉ. सना अमरीन, थेरगाव (पुणे) हॉस्पिटलच्या डॉ. संध्या भोईर, प्रोग्राम मॅनेजर प्रियांका साबळे यांनी भेट दिली होती. त्यामध्ये आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख व त्यांच्या संपूर्ण टीमचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डॉ. भाग्यरेखा पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सोहनी, डॉ. प्रकाश मोरे, रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले. या यशाबद्दल आमदार राहुल आवाडे यांनी रुग्णालयातील संपूर्ण स्टाफचे अभिनंदन करत भविष्यात या रुग्णालयात आवश्यक त्या सर्व अत्याधुनिक सुविधा व उपचार उपलब्ध करुन देण्यासह हे रुग्णालयात नंबर एकचे करण्याचा आपला मानस असल्याचे व त्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.