आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.या स्पर्धेसाठी सर्व संघांनी कसून सराव करायला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान या स्पर्धेपूर्वीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे.
स्पर्धा तोंडावर असताना स्टार खेळाडूने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा विस्फोटक फलंदाज हॅरी ब्रुकने आयपीएल २०२४ स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता दिल्ली कॅपिटल्सने त्याच्याऐवजी बदली खेळाडूचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने हॅरी ब्रुकला ४ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं होतं.
हॅरी ब्रुकचा भारत- इंग्लंड कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला होता. मात्र त्याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, हॅरी ब्रुकने आयपीएल २०२४ स्पर्धेतून नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रुकला आयपीएल स्पर्धेत जास्त सामने खेळण्याचा अनुभव नाही. त्याने या स्पर्धेत ११ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १९० धावा केल्या आहेत. गेल्या हंगामात त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघाकडून खेळताना त्याने १ शतक देखील झळकावलं होतं.