हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी झाला महत्त्वपूर्ण निर्णय

लोकसभा निवडणुकीसाठी आज कोल्हापुरात इंडिया आघाडीमधील महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर मविआच्या नेत्यांनी विस्तृत चर्चा केली.

या चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (raju shetti) सोबत आले तर ठीक अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हातकणंगलेतून लोकसभा निवडणूक लढवणार असे निश्चित करण्यात आले. यामुळे राजू शेट्टी आता काय निर्णय घेताहेत याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात इंडिया आघाडीची आज कोल्हापुरात व्ही बी पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली.

इंडिया आघाडीच्या बैठकीला आमदार जयंत पाटील (mla jayant patil), आमदार सतेज पाटील (mla satej patil), आमदार जयंत आसगावकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांच्यासह इंडिया आघाडी घटक पक्षातील नेते उपस्थित हाेते.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना देण्यासाठी इंडिया आघाडीत चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. शेट्टी हे आपल्या समवेत आले नाही तर ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना लढवेल असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने हातकणंगलेतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले असले तरी अद्याप उमेदवार काेण असणार हे अद्याप निश्चित केले नाही. परंतु मातोश्री वरून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.