जेसीबी व सोने घेण्यासाठी माहेरून 20 लाख रुपये आणावेत, यासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या सतत छळाला व अपमानास्पद वागणुकीला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
खुपसंगी (ता. मंगळवेढा) गावात ही घटना घडली असून, विवाहितेचे वडील उत्तम भाउ माने (रा.आगलावेवाडी, जवळा ता.सांगोला) यांनी मंगळवेढा पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी पती, दीर, जाऊ, सासू व सासरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सुजाता नितीन मेटकरी (वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून पती नितीन सोपान मेटकरी, सासरे सोपान सिध्दु मेटकरी व सासु मंगल सोपान मेटकरी, दिर सचिन सोपान मेटकरी व जाउ पल्लवी सचिन मेटकरी (रा.खुपसंगी ता.मंगळवेढा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.ही घटना दि.२१ मे २०१९ रोजी ते दि.१३ मार्च २०२४ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पती, पती, सासरे सासू, दीर, जाऊ हे फिर्यादीच्या मुलगी सुजाता हिस जेसीबी आणण्यासाठी पैसे व सोने आणण्याच्या व वेगळे राहण्याच्या कारणावरून क्रूरपणे वागवत होते.
दि.१३ मार्च २०२४ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तिच्या राहत्या घरी बेडरूममध्ये पत्राच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वरील पाचः जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे करीत आहेत