माजी आमदार दीपक साळुंखे- पाटील यांची मागणी…..

सोलापूर जिल्ह्यातील ३०९ दूध व महिला बंदिस्त शेळी मेंढी पालन संस्था एकूण ३०९ संस्थांना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांनी नोंदणी रद्द करणेबाबत दिलेल्या हरकतीसाठी स्थगिती देणेबाबतचे पत्र माजी आमदार दीपक साळुंखे- पाटील यांनी राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांना दिले आहे.सोलापूर जिल्हयातील अनेक संस्थांनी निवडणूक प्राधिकरण यांच्याकडे निवडणूकीसाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत.

तसेच त्यांनी संस्थाचे लेखापरिक्षण सुध्दा करुन घेतलेले आहे. या संस्थांना शासनाचे किंवा बँकांचे कोणतेही अर्थसहाय्य लाभलेले नाही.परंतु शासनाने अनेकवेळा निधी देण्याबाबत कागदपत्रे संस्थांकडून मागविलेले आहेत. परंतु त्याची निधी देण्याबाबतची कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.

याउलट ३०९ संस्थांना कोणतेही सबळ कारण नसतांना बरखास्तीची जाहिर नोटीस सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सोलापूर यांनी काढलेली आहे. तरी या संस्थांना त्यांचे परिपूर्ण कागदपत्र दाखल करुन घेण्यासाठी मुदत देण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीस स्थगिती देण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या संस्था नोंदणी करण्यासाठी महिला सभासदांना फार मोठया प्रमाणात आर्थिक खर्च करावा लागलेला आहे व त्यांचा अमुल्य वेळही गेलेला आहे.त्यामुळे त्यांचे मन उदास होऊन दि.१४ मार्च २०२४ रोजी झोपेच्या गोळ्या घेऊन जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या कार्यालयासमोर जीवन संपविण्याचे ठरविलेले असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.