यंत्रमागासाठी वीजदरात जाहीर असलेल्या सवलतीच्या अंमलबजावणीबाबत शासन निर्णयावर वस्त्रोद्योग क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यंत्रमागधारकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.यापूर्वीही शासनाने हा निर्णय जाहीर केला होता. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती.
प्रत्यक्षात वीजबिलातून रक्कम कमी झाल्यानंतरच समाधान व्यक्त होणार आहे. ऑनलाइन नोंदणीच्या किचकट अटींमध्ये पुन्हा ही सवलत लालफितीत अडकवली जाऊ नये, अशी अपेक्षाही व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोची येथील सभेत यंत्रमानधारकांना वीजबिलात सवलतीची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत २७ अश्वशक्तीखालील वीज वापर असलेल्या यंत्रमाग व्यावसायिकांना प्रतियुनिटला १ रुपया व २७ अश्वशक्तीवरील परंतु २०१ अश्वशक्तीपर्यंत वीज वापरणाऱ्यांना ७५ पैसे युनिट वीज दर सवलत लागू करण्याचा निर्णय घेतला. गेली सहा-सात वर्षांपासून प्रलंबित मागणीला निवडणुकीच्या तोंडावर का होईना मंजुरी मिळाल्याने यंत्रमाग व्यावसायिकांतून समाधान व्यक्त होत आहे.