तब्बल 76 वर्षानंतर सांगोला तालुक्यातील डोंगरी भागाला न्याय मिळाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे. डोंगरी विभागांचा विकास करण्यासाठी तसेच या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली होती. आमदार शहाजी बापू पाटील यांनी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केल्याने सांगोला तालुक्यातील नराळे, कोळा, गुनाप्पावाडी, डिकसळ, तिप्पेहाळी, कोंबडवाडी, किडेबिसरी, पाचेगाव बु. या आठ गावांचा डोंगरी क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
या डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत एक ते दोन वर्षात पूर्ण होणारी अंदाजित 25 लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. या कामांमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण खडीकरण, अंगणवाडी इमारतीचे बांधकाम दुरुस्ती, डिजिटल वर्ग खोली, शैक्षणिक साहित्य पुरवणी, शासकीय प्राथमिक शाळांची दुरुस्ती, शाळांच्या इमारत भोवती संरक्षक भिंत बांधणे, शैक्षणिक साहित्य पुरवणे, डिजिटल वर्ग खोली बांधणे, उपसा जलसिंचन योजना रस्ते विकासाची कामे, गावासाठी वाड्यांसाठी विहिरी अशी अनेक कामे करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.
