महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून अजूनही काथ्याकूट सुरू असतानाच सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडणार का? अशी शंका निर्माण झाली आहे. सांगलीची जागा आम्ही अजिबात सोडणार नाही, त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल, अशी ठाम भूमिका काँग्रेस आमदार विश्वजित कदमयांनी घेतल्याने सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये सांगलीची जागा ठाकरेंना सोडण्याबाबत एकमत झाल्यानंतर सांगलीमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. या ठिकाणी डबलमहाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर जाऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारीचे संकेत दिले होते. यानंतर सांगलीमध्ये काँग्रेसच्या गटामध्ये एकच खळबळ उडाली.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेल्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारीचे संकेत मिळाल्याने जाहीर झाल्याने विश्वजीत कदम यांनी आक्षेप घेतला आहे. आज (18 मार्च) त्यांनी सांगलीच्या जागेवरून भूमिका स्पष्ट केली. कदम म्हणाले, की सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेसच्या विचारांचा हा मतदारसंघ आहे. महाविकास आघाडीमधील कोणत्याही मित्रपक्षांनी दावा करू नये आम्ही आमच्या जागेसाठी ठाम आहोत.
सांगलीची जागा आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले. उमेदवाराला विचारांची पाठराखण लागते. सांगलीकरांनी यावर निर्णय घेतला असून काँग्रेसची या ठिकाणी स्थानिक स्वराज संस्थेमध्ये ताकद आहे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की संजय राऊत हे शिवसेना पक्षाचे नेते आहेत. ते वैयक्तिक काही सांगत असेल तर तो त्याचा प्रश्न आहे .मात्र आम्ही जागा सोडणार नाही.