कोल्हापूर लोकसभेची जागा करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना सोडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.उद्या (21 मार्च) श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उद्धव ठाकरे राजवाड्यावर जाऊन भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीची राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.कोल्हापूर लोकसभेसाठीमहाराजांचे नाव चर्चेत आल्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, काँग्रेसने कोल्हापूर मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेताना शाहू महाराजांना रिंगणात उतरवलं आहे.
तेव्हापासून कोल्हापूर लोकसभेची राजकीय गणिते बदलून गेले आहेत. महायुतीमध्ये सुद्धा उमेदवारीवरून खल सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यात महाराजांची भेट घेणार आहेत.या भेटीवेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह शिवसेना उपनेते संजय पवार यांची उपस्थिती असणार आहे. या भेटीमध्ये अर्थातच कोल्हापूर लोकसभेच्या अनुषंगाने तसेच हातकणंगले लोकसभेच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या भेटीनंतर उद्धव ठाकरे सांगलीकडे प्रस्थान करतील. सांगलीमध्ये मिरज या ठिकाणी त्यांची भव्य सभा होणार आहे. त्यामुळे या सभेपूर्वी उद्धव ठाकरे आणि महाराजांची भेट असेल.