राजू शेट्टींची उद्धव ठाकरेंना साद…….

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उद्याच्या (21 मार्च) कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचा पाठिंबा मिळावा, यासाठी साद घातली आहे.राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाकरेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोन वेळा मातोश्रीवर जाऊन भेट घेऊन पाठिंब्याबाबत चर्चा केली आहे.तुमच्या गद्दारांना धडा शिकवायचा असेल, तर मला पाठिंबा द्यावा अशी साद राजू शेट्टी यांनी ठाकरे यांना घातली आहे.

शेतकरी, शेतमजूर, उद्योजक यांचा खणखणीत आवाज संसदेमध्ये जावा अशी इच्छा असल्याचे राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले. शेट्टी यांनी आतापर्यंत दोनवेळा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, अजूनही ठाकरे यांच्याकडून याबाबत हिरवा कंदील आला नसला तरी जागावाटपामध्ये हातकणंगलेची जागा त्यांच्या वाट्याला आल्यास ते राजू शेट्टी यांना बाहेरून पाठिंबा देऊ शकतात अशी शक्यता आहे.