लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचं घोडं अडलं आहे. त्याचवेळी सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी दावा केल्याने तिढा निर्माण झाला होता.सांगली हा आपला पारंपरिक मतदारसंघ असल्याने तिथून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस आग्रही असतानाच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर कुरघोडी केली आहे.
सांगली लोकसभा मतदार संघामध्ये झालेल्या जनसंवाद मेळाव्यामधून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उबाठा पक्षाकडून कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना उबाठामधील वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. मिरज येथे झालेल्या सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, होय आज मी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतो.
ते शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडून येऊन दिल्लीत जातील. हा मर्द तुम्हाला दिलेला आहे. हा मर्द तुमच्यासाठी लढण्यासाठी मैदानात उतरला आहे. पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.