विकासाच्या अजेंड्यासाठी महायुतीला साथ द्या : नितीन गडकरी

देशात सर्वाधिक काळ सत्ता भोगणार्‍या काँग्रेसने लोकांच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष केले. काँग्रेसने स्वहितासाठी राज्यघटनेची मोडतोड केली आणि आता भाजपला दोष देत आहेत, अशी घणाघाती टीका केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली.भाजप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना बदलणार नाही आणि कुणालाही बदलू देणार नाही, असेही ते म्हणाले.

भाजपमुळे देश प्रगतिपथावर असून, राज्यातही विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यासाठी महायुती आणि इचलकरंजीचे महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना भक्कम साथ द्या, असे आवाहनही मंत्री गडकरी यांनी केले. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी शहापूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

मंत्री गडकरी म्हणाले, कुणाचा मुलगा किंवा मुलगी होणे हे काही पुण्य किंवा पाप नाही. त्यांनी स्वत:ला सिद्ध केले पाहिजे आणि लोकांनी म्हणायला हवे की, यांना निवडणुकीला उभे करा. त्यासाठी घराणेशाही म्हणून नाही, तर विकासाचे धोरण म्हणून राहुल आवाडे यांना विजयी करावे. वस्त्रनगरीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.