महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक पुतण्या काकाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. आता हा धक्का दुसरा तिसरा कुठला नसून सोलापूर जिह्यातील आहे. होय, ‘काय डोंगार…काय झाडी….काय हाटील’फेम सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांना आता घरातून आव्हान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे
कारण, त्यांचे पुतणे संग्रामसिंह पाटील यांनी पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे, ते पवारांच्या गोटात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाला पवार काका पुतण्याच्या राजकीय संघर्षाची परंपराच चालत आलेली आहे. त्यामुळे सांगोल्याच्या पाटील काका-पुतण्याची त्यात नव्याने भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. राजकीय इनकमिंग आणि आऊटगोईंही जोरात सुरू आहे. त्यामुळे कोण कोणत्या पक्षात आहे, हेच सध्या कळत नसल्याची सर्वसामान्यांची बोलकी प्रतिक्रिया आहे.