वाळवा तालुक्यातील नवेखेड गावाची जिद्द…….

वाळवा तालुका हा सर्वांच्याच ओळखीचा आहे. पूर्वीचा आणि आतामध्ये खूपच फरक प्रत्येकाला पहायला मिळत आहेच. रोजगाऱ्यांचे गाव ते संपन्न गाव असा अनोखा प्रवास वाळवा तालुक्यातील नवेखेडने जिद्द, कष्टाने केला आहे. पहिले डबल महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) गणपत खेडकर यांनी १९६० च्या दशकात या गावाची ओळख कुस्तीतील आपल्या कामगिरीने राज्यभर केली. अवघे सुमारे १२०० एकरच्या जवळपास जमीन क्षेत्र. त्यातील ७५ टक्के कोरडवाहू होते. जेमतेम उत्पन्न मिळे. एकर- दोन एकर जमीन असणारा शेतकरी मोठा. त्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत. उर्वरित बहुतांश गावकरी रोजगार करीत. शेतीकामाबरोबर विहीर खोदणे हे मुख्य काम असायचे. मुलीबाळींच्या लग्नासाठी जमीन गहाण ठेवावी लागे. सन १९६० च्या दरम्यान गावात कृष्णा नदीतून सिंचन व्यवस्था सुरू झाली. सिमेंट पाईपलाईन व इंजिनद्वारे पाणी ओढणे, असे स्वरूप होते.

नदीपासून जवळ असणाऱ्या क्षेत्रात हे प्रयोग यशस्वी झाले, तरी उन्हाळ्यात कृष्णा नदी कोरडी पडे. पुढे, नागठाणे बंधारा झाला. खऱ्या अर्थाने हरित क्रांतीला सुरवात झाली. छोट्या-मोठ्या उपसा सिंचन योजना झाल्या. अनेकांनी स्वतंत्र योजना केल्या. नगदी पीक म्हणून ऊस मोठ्या प्रमाणात घेण्यात येऊ लागला. जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय वाढला. खासगी गवळी जाऊन दूध संकलन संस्था आल्या.

‘राजारामबापू’ व हुतात्मा सहकारी साखर कारखाना, किर्लोस्करवाडीचा औद्योगिक कारखाना या ठिकाणी अनेकांना रोजगार मिळाला. या संस्था गावच्या विकासात मैलाचा दगड ठरल्या. लोकांची आर्थिक स्थिती सुधारली. शेतीवर अवलंबून असणाऱ्यांनी शेतीत वेगळे प्रयोग करून उत्पन्न वाढवीत प्रगती साधली. महिला मजुराला सहा रुपये व पुरुषांना १० रुपये मजुरी मिळे.अनेकांनी मजुरी करत एक काळ घालवला.

मात्र आजघडीला त्यांचा रोजगार थांबला. त्यांची प्रगती झाली. मुले चांगली शिकून अनेक ठिकाणी नोकरी- व्यवसायात स्थिरावली. त्यातूनही अनेक कुटुंबांची प्रगती झाली. अनेक टुमदार बंगले गावात उभे राहिले आहेत. वाढीव गावठाण म्हणून गावाशेजारील शेतजमिनी निवासी कारणासाठी वापरात आल्या. एके काळी फुफाट्याचा रस्ता व पावसाळ्यात गुडघाभर चिखल असणाऱ्या ठिकाणी आखीव-रेखीव रस्ते व गटारे झाली. ‘कार्पोरेट लूक’ असणारी ग्रामपंचायत, मध्यवर्ती सभामंडप अशी विकासाची पहाट उगवली आहे. मास्टर प्लॅन असणारे नवेखेड अधिकच सुंदर वाटू लागले. गावाने मोठ्या कष्टाने रोजगारी गावाचा शिक्का पुसला.

पूर्वीपासून असणारी सातवीपर्यंतची मराठी शाळा नवे रुपडे लेऊ लागली आहे. माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून स्थानिकांनी माध्यमिक विद्यालय स्थापन करण्याचा प्रयोग केला. मात्र तो अल्पकाळात थांबला. पुढे रयत शिक्षण संस्थेच्या सहाय्याने तो पूर्णत्वास गेला. शाळेची सुंदर इमारत आकारला आली आहे. गावात दोन राजकीय गट आहेत. निवडणुकीचा कालावधी सोडला तर इतरवेळी विकासासाठी सर्वजण एकत्र असतात. युवा पिढी राजकारणात सक्रिय आहे.

अनेकांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवीत गावचे नाव उंचावले आहे. अनेक युवक सामाजिक कामात अग्रेसर आहेत. ग्रामदैवत भैरवनाथ, देवाचा भक्तीचा जागर मोठ्या श्रद्धेने लोक करतात. विविध संप्रदायांची परंपरा आहे. चैत्री वारीला ४५ वर्षांची परंपरा आहे. दख्खनचा राजा जोतिबा येथील अनेकांचे श्रद्धास्थान आहे.