महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये होणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल केला आहे.याआधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला होता. आता देशात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या ‘नीट’ परीक्षेमुळे वेळापत्रक बदलण्याची वेळ ‘सीईटी सेल’वर आली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचे वेळापत्रक २२ मार्चला बदलले होते. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत सीईटी सेलला पुन्हा एकदा परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा लागला. यासंदर्भात सीईटी सेलने अधिकृत संकेतस्थळावर माहिती दिली आहे. त्यानुसार सुधारित वेळापत्रकातील एमएचटी-सीईटी आणि ‘नीट’ परीक्षा एकाच दिवशी येत आहेत. त्यामुळे सीईटी सेलला वेळापत्रकात बदल करण्याची वेळ आली आहे.
‘नीट’ परीक्षा ५ मे रोजी होणार असल्याने याच दिवशी ‘एमएचटी-सीईटी’मधील पीसीएम गटाची नियोजित परीक्षा होणार होती. त्यामुळे सीईटीचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे सीईटी सेलने संकेतस्थळावर जाहीर केले आहे.