हातकणंगलेतून मराठा समाजाच्या वतीने वसंतराव मुळीक यांनी निवडणूक लढवावी…

मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहानुसार महाराष्ट्रात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समाजातील कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवावी असे ठरले आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातून समाजाचे ३० वर्षे प्रामाणिकपणे काम करणारे आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संघटनेची ताकद निर्माण करणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी मराठा समाजातून होत आहे.

प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्तेसुद्धा ही लोकसभा निवडणूक लढवण्याची मागणी करत आहेत. यातच हातकणंगलेमध्ये मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीतही वसंतराव मुळीक यांनी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ही लोकसभा निवडणूक जिंकून मराठा आरक्षणाचा कायदा लोकसभेतून मंजूर करून आणावा. या निवडणुकीत समाजातील तरुण जीवाचे रान करून वसंतराव मुळीक यांना निवडून आणतील, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त केली.