कोल्हापुरात भाजपा नेत्याने चांगलेच सुनावले..

कोल्हापूर लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर कोल्हापुरात आज, शुक्रवारी भाजपच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र यावेळी मंडलिक यांची भाजप नेत्याने चांगलीच कानउघडणी केली.

आम्ही तुम्हांला निवडून आणण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला. परंतू तुम्ही निवडून गेल्यानंतर आमची कामे केला नाहीत. मतदान करायला आम्ही आणि काम मात्र कॉंग्रेसवाल्याची होणार असं यापुढं चालणार नाही अशा शब्दात भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासमोरच रोखठोक भाषण केले. त्यांच्या या भाषणाला कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.

जाधव म्हणाले, कोल्हापूर आणि हातकणंगलेसाठी आम्ही दोन वर्षे राबत आहोत. एक तरी मतदारसंघ आम्हांला मिळावा अशी अपेक्षा होती. यापुढं इतरांची नाही तर आमची कामं झाली पाहिजेत. इथून पुढं एकाही कॉंग्रेसच्या नेत्याचं गुणगान कुणीही गाता कामा नये. धनंजय महाडिक यांना उद्देशून जाधव म्हणाले, पालकमंत्र्यांना पण हे सांगण्याची गरज आहे की जुनी मैत्री आता विसरा. महापालिका, गोकुळ, केडीसीसीमध्ये इकडं सोबत आणि तिकडं विरोध हे चालणार नाही. आम्हांला पण सोन्याचे दिवस यायला पाहिजेत. मंडलिक यांनी गेल्या लोकसभेनंतर उध्दव ठाकरे यांच्यासोबत आम्ही गेलो. त्यामुळे अंतर पडल्याच मान्य करत यापुढे दक्षता घेण्याची ग्वाही यावेळी दिली.