मंगळवेढा तालुक्यातील चौघांना चार जिल्ह्यातून हद्दपार……

मंगळवेढा पोलीस ठाण्यांतर्गत विविध कलमांन्वये एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या चंद्रकांत राजाराम घुले (रा.मंगळवेढा), विशाल दत्तात्रय जाधव (रा.चोखामेळानगर), दिगंबर तानाजी जाधव (रा.मरवडे), बंडू येदा मेटकरी (रा.खडकी) या चौघांना उपविभागीय दंडाधिकारी मंगळवेढा यांनी चार जिल्ह्यातून हद्दपार केले असून, त्यांच्या विरुध्द मंगळवेढा पोलीस ठाणे अंतर्गत जुगार, गौण खनिज, शरीराविषयक, विनयभंग, शासकीय नोकरावरील हल्ले, खून, अॅट्रॉसिटी अॅक्ट, फसवणूक अशा वेगवेगळ्या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत.वरील व्यक्तीविरुध्द एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असून देखील त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत बदल झालेला नाही.

त्यांच्या प्रवृत्तीमुळे परिसरातील लोकांत दहशत होती.सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांच्या विरुध्द पोलीस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण) यांच्याकडे वरील इसमांविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनिमय १९५१ चे कलम ५६ (ब) प्रमाणे हद्दपार प्रस्ताव पाठवून देण्यात आलेले होते.पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी (मंगळवेढा विभाग) यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती.

त्यांनी सदर प्रस्तावाची चौकशी करून उपविभागीय दंडाधिकारी (मंगळवेढा विभाग) यांच्या न्यायालयात अंतिम आदेश करीता हद्दपार प्रस्ताव पाठवून दिलेला होता.सदर प्रकरणाची सुनावणी घेऊन न्यायालयाने वरील चौघांना सोलापूर, पुणे, सातारा, सांगली या ४ जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे. गेल्या अनेक वर्षापासून पहिल्यांदाच अशी मोठी कारवाई झाली आहे.