इचलकरंजीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घृण खून!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी दोन दिवसांपासून पोलिसांकडून शोध सुरू असलेल्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा आज खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला.रोहित तडाखे (वय २६, रा. इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. येथील साईट नंबर १०२ मधील आंबेडकर मैदानात त्याचा चाकूने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. गावभाग पोलिसांनी घटनास्थळावरून दोन चाकू जप्त केले आहेत. हा खून पूर्ववैमन्यसातून झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.
याबाबत गावभाग पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः साईट नंबर १०२ मधील आंबेडकर मैदानात रात्री साडेदहाच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह भागातील नागरिकांना आढळून आला. नागरिकांनी याची माहिती गावभाग पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित तडाखे याचाच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्वरित पंचनामा करत तपास गतिमान केला. पोलिस उपाधीक्षक समीरसिंह साळवे, पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, त्याने मोबाईल घरीच ठेवला होता. त्याच्या मित्राचा या मोबाईलवर रात्री साडेसातच्या सुमारास फोन आला. त्याच्या आईने तो घरात नसल्याचे सांगितले होते. घरातून बाहेर गेलेल्या रोहितचा मृतदेहच पाहायला मिळाला. हातावर, गळ्यावर जबर वार करत त्याचा दोन ते तीन जणांनी खून केल्याचे तपासात पुढे आले. दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, पोलिस पथके त्यांचा शोध घेत आहेत.