सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत प्रत्येक पक्ष जोरदार तयारीला लागलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीचे रणांगण तापले असतानाच आटपाडी तालुक्यातील शिवसेना (शिंदे गट) कोणती भूमिका घेणार आहे याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी अद्याप कोणतीच अधिकृत भूमिका घेतलेली नाही पण भाजप नेत्यांशी त्यांनी कायमच अंतर राखल्याचा पूर्वइतिहास आहे.गेल्या आठवड्यात सांगली येथील कार्यक्रमात विशाल पाटील व तानाजी पाटील एकत्र आले होते.
विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक व तानाजी पाटील यांचा जुना स्नेह आहे. त्यामुळे महायुतीतील शिवसेना आटपाडी तालुक्यात युतीधर्म पाळणार का? असा प्रश्न आहे. आटपाडी तालुक्यात शिवसेनेची ताकद भाजपच्या बरोबरीने आहे. यामुळेच शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आटपाडी तालुक्यात महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये कमालीचा संघर्ष पहायला मिळत आहे. तानाजी पाटील यांचा संघर्ष भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व देशमुख गटाबरोबर आहे.
खासदार संजय पाटील व शिवसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे गेल्या काही वर्षांपासून सूर बिघडले होते. तानाजी पाटील यांचेही खासदारांसोबत सूर जुळलेले नाहीत. यादरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत तानाजी पाटील कोणती भूमिका घेणार? हे महत्त्वाचे आहे. विशाल पाटील रणांगणात उतरल्यास ते काय करणार ते नेमकी याबाबत कोणती भूमिका घेणार हादेखील प्रश्न अनुत्तरीत आहे.