MI vs RR : मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव!

आयपीएल 2024 स्पर्धेत पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्सला आणखी वाट पाहावी लागणार आहे. मुंबई इंडियन्सचा सलग तिसऱ्यांदा पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्सला होमग्राउंड वानखेडेही तसं भावलं नाही. मुंबईला विजयासाठी आणखी एका सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. मुंबईचा या स्पर्धेतील सलग तिसरा पराभव असून शेवटच्या स्थानावर आहे. आता मुंबईला साखळी फेरीत 10 सामने खेळायचे असून पुढील प्रवास आणखी खडतर होणार आहे.

पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने, दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आणि आता तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पराभवाचं पाणी पाजलं आहे. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमवून 125 धावा केल्या आणि विजयासाठी 126 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान राजस्थान रॉयल्सने 4 विकेट्स गमवून 15.3 षटकात पूर्ण केलं.मुंबईच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. इतकंच काय तर आघाडीचे तीन फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही. रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस शून्यावर बाद झाले. इशान किशनही काही खास करू शकला नाही. अवघ्या 16 धावा करून बाद झाला.

तर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने चांगली फलंदाजी केली. पण संघाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जाऊ शकले नाहीत. हार्दिक पांड्याने 34, तर तिलक वर्माने 32 धावा केल्या. टिम डेविड 17, पियुष चावला 3, गेराल्ड कोएत्झी 4 धावा करून तंबूत परतले. दुसरीकडे, राजस्थानकडून रियान परागने 39 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 54 धावांची खेळी केली. तर मुंबईच्या आकाश मढवाल आणि क्वेना मफाका वगळता एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. जसप्रीत बुमराहने 4 षटकं टाकली मात्र त्यालाही यश मिळालं नाही.