इचलकरंजीचा पाणीप्रश्न काही काळासाठी जोर धरू लागला होता. पण आता मात्र हा प्रश्न थंडावलेला पाहायला मिळत आहे. गत निवडणुकीत शहरातील पाणीप्रश्न गाजला होता. पाच वर्षे झाली तरी पाणीप्रश्नाबाबत ठोस काहीच झाले नाही. त्यात निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावून पाणीप्रश्न सोडविण्याचे काम सुरु असल्याचे दाखविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात पाणीप्रश्नाला गती दिसत नाही. सुळकूड पाणी योजनेवर तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यातच विलंब केल्याने एक महिना लोटला तरी अद्याप अहवाल सादर झालेला नाही.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने अधिकारी निवडणुकीच्या कामात मग्न आहेत. त्यामुळे सुळकूड योजनेचा अहवाल तयार होण्यास व मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन मूळ निर्णयापर्यंत पोहोचण्यास पुन्हा विलंब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुळकूड पाणी योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी १ मार्चला मुंबईत दोन्ही गटांची बैठक झाली होती. या बैठकीत
तज्ज्ञ समिती नियुक्त करून एका महिन्यात अहवाल देण्यास सांगितले होते. परंतु, यावर तातडीने हालचाली झाल्या नाहीत. तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यातच वेळ गेला. त्यामुळे नागरिकांच्या सूचना व हरकती मागविण्यासही विलंब झाला. सूचना व हरकती सादर करण्याची मुदत संपलेली आहे.सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे.
अधिकाऱ्यांबरोबरच राजकीय पक्षही निवडणुकीच्या धामधुमीत अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ समितीच्या किती बैठका होणार? कधी अभ्यास होणार आणि अहवाल कधी सादर होणार, हा प्रश्न आहे तसेच अहवाल सादर झाला तरी मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी बैठक बोलविण्याची शक्यता धूसर आहे. लोकसभेचा निकाल ४ जूनला लागणार आहे. त्यानंतरच सुळकूड पाणी योजनेसंदर्भात हालचाली गतिमान होण्याची शक्यता आहे. तूर्त तरी हा विषय थंडावला आहे. त्यामुळे याचा मतावरही परिणाम होऊ शकतो.