महाविकासआघाडीत सांगली लोकसभेवरून निर्माण झालेला तिढा सुटता सुटेना. उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना (Chandrahar Patil) उमेदवारी जाहीर केली आहे. पण काँग्रेसने विशाल पाटलांना (VIshal Patiil) उमेदवारी द्यावी यासाठी टोकाची भूमिका घेतली आहे. पण दिवंगत आर आर आबांचे पुत्र रोहित पाटलांना सांगली लोकसभेत उमेदवार म्हणून कोण हवा आहे? चंद्रहार पाटील की विशाल पाटील? संजय पाटील लोकसभेत आणि आबांचं कुटुंब विधानसभेत असं खरंच ठरलंय का? चंद्रहार पाटलांना उमेदवारी देण्यामागे राष्ट्रवादीतील बड्या नेत्याचा हात आहे का? या प्रश्नांना रोहित पाटलांनी उत्तर दिली आहेत.
यावेळी बोलताना जो कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्यांना निवडूण आणण्यासाठी प्रयत्न करु, असं ते म्हणाले.
रोहित पाटील म्हणाले की, दोन दिवसाचा दौरा शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये आखण्यात आला होता आणि त्या निमित्ताने आम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघात आलेलो आहे. अनेक घटकांच्या भेटी घेत आहोत. अनेक लोकांच्या भेटीत लोकांच्या भावना काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. सांगलीच्या बाबतीत अद्याप कुठला निर्णय हा झालेला नाहीये. तीन तारखेला एकत्रितपणे बसून जो निर्णय होईल त्या निर्णयावर ते आम्ही सगळेजण निश्चित पणाने ठाम असू, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
काँग्रेस पक्ष म्हणून काँग्रेस आपली भूमिका मांडत आहे. आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे ठाकरे गटाला सुद्धा ती जागा आपल्याला मिळावी असे वाटते एकंदरीत सगळी ताकद लक्षात घेता.निश्चितपणे महाविकास आघाडीमध्ये चांगल्या पद्धतीने सकारात्मक निर्णय सांगलीमध्ये होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.