आष्टा येथील जुन्या शिंदे मळ्यात सोमवारी रात्री मोकाट कुत्र्यांनी गायींच्या वासरावर हल्ला करून तीन वासरे ठार मारली. चार दिवसापूर्वी देखील एक वासरु ठार मारले आहे. मोकाट कुत्र्यांनी शहरामध्ये उच्छाद मांडला असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आष्टा बावची रस्त्यावर असणाऱ्या जुन्या शिंदे मळ्यातील जयवंत बबन शिंदे व धनाजी बाळासाहेब देसाई या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोट्यात शिरुन मोकाट कुत्र्यांनी गायींच्या लहान वासरांचे लचके तोडले. यामध्ये तीन वासरे
जागीच ठार झाली. सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटे या दरम्यान जयवंत बबन शिंदे यांच्या गोट्यात तीन वासरांवर तर चार दिवसापूर्वी धनाजी देसाई यांच्या गोट्यातील एका वासरांवर हल्ला करून कुत्र्यांनी त्यांचे लचके तोडले. यामध्ये ही वासरे ठार
झाली आहेत.
सुमारे पन्नास घरे असणाऱ्या या भागातील लोकवस्तीच्या ठिकाणी २०० हून अधिक लहान मोठी जनावरे आहेत. भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून वासरे ठार मारल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. आष्टा नगरपालिका प्रशासनाने शहरातील मोकाट कुत्री पकडून त्यांचे निर्बिजकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे. जुना शिंदे मळा हा भाग देखील पालिकेच्या कार्यक्षेत्रात येत आहे. त्यामुळे पालिकेने ही मोहिम मळे भागातही राबवून मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.