सांगली ते मुंबई निघणार आरक्षण वारी! सायकल रॅलीचेही नियोजन

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्हाभर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. जरांगे-पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे पायी चालत ते मुंबईत पाेहोचणार आहेत.याच आंदोलनात सहभागी होण्यासाठी सांगलीतूनही आरक्षणाची वारी काढून मराठा बांधव मुंबईतील आंदोलनात सहभागी होतील, असा निर्णय घेण्यात आला. सांगलीत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली.

आंदोलनात सहभागी होण्यासाठी सांगलीतील बांधवही चालत जाणार आहेत. ते जरांगे-पाटील यांच्यासोबत पुण्यापासून मुंबईकडे रवाना होणार आहेत. या पदयात्रेला आरक्षण वारी असे नाव देण्यात आले आहे. त्यात गावागावांतील मराठा बांधव सहभागी होणार आहेत. २२ जानेवारीला सांगलीतून या वारीला सुरुवात होणार आहे.

आरक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. २० जानेवारीला सांगलीतून सकाळी ही रॅली मुंबईच्या दिशेने रवाना होईल. ज्या बांधवांना सायकल रॅलीत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी अशोक पाटील कोकळेकर, युवराज शिंदे यांच्याशी संपर्क साधावा.

जिल्ह्यातून मिळेल त्या वाहनाने आणि ज्यांना शक्य आहे, त्यांनी वारीमध्ये चालत सहभागी होऊन आरक्षणाच्या लढ्याचा भाग व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. संजय पाटील, प्रशांत भोसले, ऋषिकेश पाटील, युवराज शिंदे, अशोक पाटील, शंभोराज काटकर यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.