Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्सला धक्का!

 चेन्नई सुपर किंग्सला(Chennai Super Kings) सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान बांगलादेशला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आगामी 5 एप्रिलला हैदराबादविरुद्धच्या सामन्याला मुस्तफिजुर रहमान मुकण्याची शक्यता आहे. आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेला 1 जूनपासून सुरु होणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व देशांचे क्रिकेट बोर्ड खेळाडूंच्या व्हिसासाठी तयारी करत आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डही खेळाडूंसाठी व्हिसा तयार करत आहे.

याच कारणामुळे मुस्तफिजुर रहमानला बांगलादेशला जावे लागले. मुस्तफिजुर रहमानला पुन्हा भारतात येण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. मुस्तफिजुर वेळेवर पोहोचला नाही तर तो पुढील सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात 3 मेपासून पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठीही मुस्तफिजुरला आपल्या देशात परतावे लागणार आहे. मुस्तफिजूरकडे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वेळ आहे. बोर्डाने त्याला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंतच आयपीएलचे सामने खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे मोठे नुकसान होऊ शकते. आतापर्यंत मुस्तफिजुरने या हंगामात 3 सामन्यात 7 विकेटेस घेतल्या आहेत.