हातकणंगलेत होणार चौरंगी लढत! कोण मारणार बाजी?

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून शिवसेनेने माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांना उमेदवारी देऊन निष्ठावंताचा सन्मान केला आहे. आता हातकणंगलेत विद्यमान खासदार शिंदे शिवसेनेचे धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, ठाकरे शिवसेनेचे सत्यजित पाटील-सरुडकर व वंचित बहुजन आघाडीचे डी. सी. पाटील यांच्यात चौरंगी लढत होईल.

ठाकरे शिवसेनेने शेट्टी यांना पाठिंबा नाकारला आहे. राहुल आवाडे यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. या लढतीत बाजी कोण मारणार, याचीच चर्चा आता आहे. गेल्या वेळी तिरंगी लढतीचा फटका राजू शेट्टी यांना बसला होता.

या मतदारसंघाने नेहमीच धक्कादायक निकाल दिले आहेत. 1977 च्या जनता लाटेत बाळासाहेब माने यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळविला. तर 2004 साली तत्कालीन खासदार निवेदिता माने यांना पराभूत करून राजू शेट्टी यांनी विजय मिळविला. 2019 मध्ये राजू शेट्टी यांना शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी पराभूत केले. आता ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

मात्र, गेल्या दोन दिवसांत त्यांची उमेदवारी बदलणार, याची चर्चा रंगली. अचानकपणे त्यांच्या मातोश्री निवेदिता माने यांचेही नाव चर्चेत आले. मात्र, या सर्व बातम्या विपर्यास्त असल्याचे सांगून धैर्यशील माने यांनी त्याचे खंडन केले.