आटपाडीत टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची गरज

आटपाडीत चारचाकी गाडी अडवून एका युवकाला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेचा वचपा काढण्यासाठी मंगळवारी रात्री दोन आलिशान गाड्यांतून आलेल्या सशस्त्र युवकांनी त्यांच्या गटातील युवकाला मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकावर हल्ला केला. दैव बलवत्तर असल्याने अंधार आणि चिखलात पाय अडकल्याने ज्याला मारायचे होते तो युवक पळून गेला. आटपाडी बसस्थानकासमोर झालेल्या या थराराने शहरामध्ये भीतीचे वातावरण आहे.

पोलिसांनी या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसआरपीएफ जवानांच्या सोबत पोलिसांच्या संचलनानंतर अवघ्या चार दिवसांत घडलेली ही घटना पोलिसांची जरब नसल्याचे दाखवून देत आहे.बसस्थानक परिसरात दोन वर्षांत वादाचे प्रसंग वरचेवर होत आहेत. तालुक्यातून अनेक
महाविद्यालयातील युवक आणि युवती बसने येतात.

बसस्थानकासमोर हे टवाळखोर युवक सातत्याने दहशत माजविण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दुकानदार अशा युवकांना आश्रय देतात. नुकतीच मुख्य बाजारपेठेतील रस्त्याच्या कामावरून कामगारांना मारहाण झाली. हे चिघळणारे प्रकरण अखेर सामोपचाराने मिटले. आटपाडीत महाविद्यालयीन तरुणांसह टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे. शाळा, कॉलेजच्या
मुली, महिलांच्या लगत दुचाकी चालविणे, वेगाने गाडी पळवणे, अश्लील हावभाव आणि भाषा वापरणे हे प्रकार घडत आहेत.


याबाबत नागरिकांनी आणि विशेषतः पोलिसांनी विशेष सहकार्य दिले पाहिजे. आटपाडी शहरात चौकाचौकात युवकांचे जथे थांबतात. त्यांना अटकाव करण्याची गरज आहे. परंतु पोलिस यंत्रणेने डोळ्यावर पट्टी बांधून कायदा आणि सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर सोडलेली दिसत आहे.