आष्टा नगरपालिकेत अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई…..

आष्टा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील नगरपालिकेच्या मालकीच्या सिटी सर्व्हे क्र. ११०० मधील भूखंडावरील गेल्या अनेक वर्षापासून असलेले अतिक्रमण पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पोलिस बंदोबस्तात काढून टाकले. या जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सार्वजनिक वाचनालय बांधण्यात येणार आहे.

आष्टा नगरपालिकेच्या मालकीचा सिटी सर्व्हे क्र. ११०० मध्ये अडीच गुंठ्याचा प्लॉट आहे. या जागेवर आष्टा शहराच्या मंजूर विकास आराखड्यात वाचनालय व व्यायामशाळेचे आरक्षण आहे. याच जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वाचनालय बांधण्यात येणार आहे. यासाठी आष्टा नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिवशी २३ जानेवारी २०२४ रोजी प्रशासकीय ठराव मंजूर केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही ठरावाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र नगरपालिकेच्या मालकीच्या या जागेवर येथील एका कुटुंबाने अनेक वर्षापासून अतिक्रमण केले होते.महाराष्ट्र शासनाच्या महसुल व वनविभागाच्या परिपत्रकानुसा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वजनिक किंवा मोकळ्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास ते तात्काळ काढून टाकण्याचे शासनाचे आदेश आहेत.