आष्टा येथे क्रीडांगणासाठी सेवाभावी संस्थेतर्फे सह्यांची मोहीम 

आष्टा शहरात क्रीडांगण व्हावे यासाठी बापूसो शिंदे सेवाभावी संस्थेच्या वतीने सोमवारी नागरिकांची सह्यांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात क्रीडाप्रेमी खेळाडू यांच्यासाठी क्रीडांगण झालेच पाहिजे असा सूर सर्वत्र उमटला. आष्टा शहरामध्ये क्रीडांगण व्हावे अशी गेले कित्येक वर्षे येथील नागरिकांची मागणी आहे. नगरपालिका व शासन स्तरावर कै. बापू शिंदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून वारंवार मागणी केली होती. मात्र, पालिका प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.

या पार्श्वभूमीवरती बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्थेच्या सदस्य यांनी स्वाक्षरी मोहीम पुकारली. शहराच्या प्रमुख रस्त्यावरील दत्त मंदिर परिसरामध्ये स्वाक्षरी स्टॉल उभा करण्यात आला. सेवाभावी संस्थेचे संस्थापक संग्राम शिंदे, विजय कदम, शहाजान जमादार, कदम, महादेव झांबरे, नाना टकले यांनी नागरिकांना स्वाक्षरीचे आवाहन केले. नागरिकांनी क्रीडांगणासाठी आव्हानाला साथ देत प्रतिसाद देत उस्फूर्तपणे स्वाक्षऱ्या केल्या. स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांची मागणी आष्टा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यापुढे ठेवण्यात येणार आहे. पालिकेने तत्काळ याबाबतचा निर्णय घ्यावा अन्यथा याबाबत आंदोलन करू असा इशाराही काही नागरिकांनी या ठिकाणी दिला.