धैर्यशील माने-राजू शेट्टी बदलता प्रवास बनला चर्चेचा विषय!

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आणि त्यांचे प्रतिस्पर्धी शेतकरी नेते राजू शेट्टी हे पुन्हा एकदा परस्परांसमोर उभे ठाकले आहेत. नवा सामना करत असताना दोघेही मागील निवडणुकीपेक्षा यावेळी वेगळा पक्ष, नेतृत्व, झेंडा घेऊन रिंगणात उतरले आहेत. दोन्ही घराण्यांचा इतिहास पाहता त्यांचा हा बदलत गेलेला यावेळचा सहावा झेंडा आहे. या दोघांना प्रबळ आव्हान देणारे माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या घराण्याने दोनदाच झेंडे बदलले आहेत.

हातकणंगले मतदारसंघातील खासदारांची यादी तपासली तर त्यामध्ये मुख्यत्वेकरून माने घराण्यांचेच वर्चस्व राहिले आहे. त्यांच्या घरात आठ वेळा खासदारकी आली आहे. काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दोनदा खासदारकी भूषवली आहे. आता माने – शेट्टी यांच्यात मुकाबला होत असताना दोन्ही घराण्यांतील बदलत गेलेले झेंडे हा मतदारसंघात चर्चेचा विषय बनला आहे.