इस्लामपूर येथील राजारामबापू बँक देशात अग्रेसर ठरेल: आ. जयंत पाटील

इस्लामपूर येथील राजारामबापू सहकारी बँकेचा लोगो सोन्याच्या आपट्याच्या पानाप्रमाणे आहे. त्याच्या वैशिष्ट्याप्रमाणे आपली बँक ग्राहकाभिमुख ठरली असून देशात अग्रेसर ठरेल. असे प्रतिपादन आ. जयंतराव पाटील यांनी केले. पेठ येथे राजारामबापू बँकेच्या प्रधान कार्यालयात लोगो अनावरणप्रसंगी ते बोलत होते. आ. जयंत पाटील म्हणाले, राजारामबापूंचा आदर्श ठेवून वाटचाल सुरु आहे. बँकेच्या चोख व्यवस्थापनामुळे आपली बँक सरस ठरली. खऱ्या अर्थाने प्रा. शामराव पाटील यांचे योगदान अधोरेखीत ठरते. कर्जदाराचे समुपदेशन शाखाधिकाऱ्यांनी केले पाहिजे. त्यांच्या आर्थिक परिस्थतीतीचा अंदाज घेवून प्रक्रिया राबवावी.

बँकेच्या जडणघडणीत स्व. डी. जी. पाटील, शामराव वाटेगावकर, स्व. जनार्दनकाका पाटील यांच्यासह सेवानिवृत्त कार्यकारी संचालक आर. एस. जाखले यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. शामराव पाटील म्हणाले, बँकेचा कारभार करताना आर्थिक शिस्त जपली. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस मुंबई येथे लोगोसाठी स्पर्धा घेतली. बँकेच्या २२९० कोटी ठेवी असून १६१० कोटीचा कर्जपुरवठा केला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सॉफ्टवेअरद्वारे ग्राहकांना अत्यंत चांगल्या सेवा पुरविण्यात येतात. बँकेच्या सध्या ४८ शाखा कार्यरत असून लवकरच कवठेमहांकाळ व कुपवाड येथे नवीन दोन शाखा सुरू करण्यात येणार आहेत. यावेळी बाळासो पाटील, दादासो पाटील, आर. डी. सावंत, संदीप पाटील, आर. ए. पाटील व अधिकारी उपस्थित होते. संचालक माणिकराव पाटील यांनी आभार मानले..