गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर इचलकरंजी शहरातील विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांची भेट घेणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी सांगितले आहे.
सत्यजित पाटील सरूडकर हे लोकसभा निवडणुकीचा निकाल ठरवणाऱ्या इचलकरंजी शहरात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला भेट देत असून यावेळी काँग्रेस कमिटीमध्ये इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर अनेक पक्षांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती बावचकर यांनी दिली आहे.
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सायंकाळी पाच वाजता शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीने शहर काँग्रेस कार्यालयात ते येणार आहेत. त्या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न होणार असून सत्यजित पाटील सोमवारी शहरात मुक्काम करणार आहेत.
मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ते सकाळपासून शहरातील विविध मान्यवर, संघटना, घटक पक्ष, विविध असोसिएशनचे प्रतिनिधी यांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधणार आहेत.