हातकणंगले मधील तारदाळ व खोतवाडी या दोन्ही गावांमध्ये भारत निर्माण नळ पाणीपुरवठा ही योजना आहे. या योजनांद्वारे या गावांसाठी पाणीपुरवठा केला जातो. परंतु खंडित पाणीपुरवठ्याकडे लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तारदाळ व खोतवाडी या गावात चार ते पाच दिवस पाणीपुरवठा होतो.
तसेच काही तांत्रिक अडचणीमुळे 5 एप्रिल पर्यंत तारदाळ खोतवाडी मधील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होता. नंतर पाणीपुरवठा सुरू झाला. परंतु अजून देखील तेथील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ठराविक भागातच टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याने उर्वरित भागात पाण्याची समस्या ही भेडसावतच आहे. ही पाण्याची समस्या लक्षात का येत नाही? असा सवाल नागरिकांतून होत आहे.
शासनाने मंजूर केलेल्या 52 कोटीच्या जलजीवन योजनेचे काम अजूनही अर्धवट असल्याने तारदाळ व खोतवाडीकरांना पाण्याच्या समस्याला सामोरे जावे लागत आहे. जर पाण्याची अशी स्थिती कायम राहिली तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा वाढीव भागातील महिलांच्यामध्ये होताना दिसत आहे.