दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झालेली आपणास पहायला मिळत आहे. अशातच तारदाळ येथे खुनी हल्ला झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे औद्योगिक वसाहतीत मैडिंग कामास महिना वीस हजार रुपये हप्ता देण्यास नकार दिल्याने रॉड, काठी, सळी व दगडाने खुनीहल्ला केल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले. सम्राट घोरपडे, राजकुमार यादव, पवन माने अशी जखमींची नावे आहेत.
याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा दाखल झाला असून, यामध्ये तारदाळच्या विद्यमान सरपंचाचे पती रणजित पोवार, दीर सचिन पोवार उपसरपंच प्रवीण पाटील, प्रकाश आडके, तेजस बन्न यासह अनोळखी एक अशा सहाजणांचा समावेश आहे. ही घटना तारदाळ, गंगानगर येथील बंब यांच्या कारखान्यासमोर सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद सम्राट घोरपडे यांनी शहापूर पोलिस ठाण्यात दिली आहे. याबाबत विरोधी तक्रार देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
घोरपडे हे मेंडिंगचे मागण्याकरिता गेले होते. तेथे सचिन पोवार, रणजित पोवार आले व त्यांनी तुला काम पाहिजे असेल तर महिन्याला आम्हास २० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे म्हणाले. त्यावेळी घोरपडे यांनी मला पैसे द्यायला जमणार नाही, असे म्हणताच त्यांना मारहाण केली. त्यावेळी घोरपडेंसोबत आलेले राजकुमार यादव, पवन माने यांनाही मारहाण केली. या घटनेमुळे घोरपडेंसोबत आलेले तेजस खोत, अवधूत अतिग्रे, अमर कोळी घाबरून पळून गेले. जखमींवर इचलकरंजी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.