खानापूर घाटमाथ्यावरील शाळांत पटसंख्येची स्पर्धा

खानापूर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खानापूर घाटमाथ्यावरील शाळांनी पुढील वर्षासाठीचे प्रवेश सुरू केले असून, वाढत्या शाळांच्या संख्येमुळे विद्यार्थी पट टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी शाळांच्यामध्ये तीव्र स्पर्धा दिसून येत आहे.
खानापूर परिसरामध्ये गेल्या काही वर्षापासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहे.

पण कोरोनानंतर – पालकांचाही जिल्हा परिषदेच्या शाळांकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे शाळांना विद्यार्थी अपुरी पडू लागल्याने सर्व शाळातील शिक्षक घरोघरी जाऊन शाळेविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये प्रवेश निश्चित करत आहेत. खानापूर घाटमाथ्यावर गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निवासी शाळांमध्ये ठेवण्याकडे पालकांचा कल वाढू लागला आहे.

त्यामुळे नवीन विद्यार्थी आणणे व पटसंख्या टिकवण्याचे शाळांच्या पुढे मोठे आव्हानच निर्माण झाले आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अजून खूप कालावधी असला तरी आतापासूनच संस्था व शाळा विद्यार्थीपटाच्या नियोजनामध्ये गुंतल्या आहेत. शाळांमधील वाढती स्पर्धा बघता शैक्षणिक गुणवत्तेतही वाढ व्हावी, अशी अपेक्षा पालकांमधून व्यक्त केली जात आहे